शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

समाधान

समाधान
एकदा एक माणूस एका मंदीरात गेला.... त्याने पाहीले
एक मुर्तीकार एका देवतेची मुर्ती घडवत होता....
तो जी मुर्ती घडवत होता अगदी तशीच हुबेहुब अजुन एक मुर्ती
बाजुला पुर्ण झालेली होती... त्या माणसाला कुतुहुल वाटले
त्याने मुर्तीकाराला विचारले.
" तुझ्या कडे एक मुर्ती तयार असताना परत तु हुबेहुब अशीच दुसरी
मुर्ती का घडवत आहे. इथे दोन मुर्ती स्थापन करणार आहात का ?"
" नाही " त्याचाकडे न पाहताच मुर्तीकार म्हणाला , " एकचं मुर्ती
स्थापणार आहे पण हा पहीली मुर्ती बनवताना चुकली आहे "
त्या माणसाने त्या अप्रतीम मुर्तीचे चहुबाजूने निरिक्षण केले
त्याला त्यात काहीच चुकलेले दिसले नाही .
" ही मुर्ती तर अप्रतीम आहे यात तर काहीचं चुकलेले दिसत नाही "
" त्या मुर्तीच्या नाका जवळ एक बारीक ओरखडा जास्त झाला आहे "
मुर्तीकार बोलला अजुनही तो त्याच्या कामात गुंग होता.
"ही मुर्ती तुम्ही कुठे स्थापणार आहात ?" तो माणूस
" या समोरच्या खांबाच्यावर जवळपास जमीनी पासून २५ फूट उंच" मुर्तीकार
" जर तो इतक्या तो इतक्या वर असणार आहे तर मग कोणालाच
समजणार नाही की मुर्तीच्या नाकाला एक ओरखडा जास्त आहे " तो माणूस
तो मुर्तीकाराने त्याचे काम थांबवले, त्या माणसाकडे निरखून पाहीले ,
मग एकदम दिल खुलास हसला आणि म्हणाला .
" कोणाला समजले नाही तरी माला तर माहीत आहे ना "
कोणतेही कामाचे मुल्यमापण करताना ते काम केल्याचे आपणाला
समाधान नसेल तर मग दुसर्‍याने त्या कामाची कितीही प्रशंसा केली
तरी त्याचा काही उपयोग नसतो....
Sources : Unknown

इतरांचं कायम ऐकत बसलात तर..

इतरांचं कायम ऐकत बसलात तर...
एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ.
सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची.
माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते.
लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल.
पण बेडूक काही ऐकत नाहीत.
स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’
तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात.
टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल.
एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात.
एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो.
वर जाऊन पाहतो.
ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो.
लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात.
हे घडलं कसं?
तो बेडूक खाली उतरतो.
सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी?
तरी तू डबकं कसं काय सोडलंस?
तो बेडूक काहीच बोलत नाही.
तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही.
सगळे गप्प होतात..
त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.
इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल?
Sources : Unknown

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.
एका राजाजवळ खादाड बकरा होता. राजाने दवंडी दिली, बकऱ्याला जंगलात चरायला नेऊन तृप्त करून आणेल, त्याला अर्धे राज्य बक्षीस. पण बकरा तृप्त झाल्याची परीक्षा मी घेईल. काम खूप सोपे वाटून एकजण धावत राजाकडे आला. बकरा घेऊन जंगलात गेला. दिवसभर कोवळे हिरवेगार गवत चरायला दिले. संध्याकाळी त्याला वाटले, दिवसभर बकरा चरतोय, नक्कीच त्याचे पोट भरले असणार. बकऱ्याला घेऊन राजाकडे आला. राजाने हिरवे गवत टाकल्याबरोबर बकरा खाऊ लागला. राजा म्हणाला, याला पोटभर खाऊघातले नाहीस. अन्यथा त्याने गवत खाल्ले नसते.
नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले. एका सुविचारी माणसाला वाटले, राजाच्या दवंडीत रहस्य आहे. काम युक्तीने केले पाहिजे. त्याने बकरा जंगलात नेला. बकऱ्याने गवत खायला सुरूवात केली की, तो बकऱ्याला काठीने मारीत असे. दिवसभर असे घडल्याने बकऱ्याची मानसिकता अशी झाली की, गवताला तोंड लावले की मार मिळतो. संध्याकाळी सुविचारी मनुष्य बकऱ्यासह दरबारात आला. राजाने गवत टाकले. बकरा त्याकडे पहायला तयार होईना. कारण गवत खाल्ले की मार बसण्याची भीती!
आपले मनही असेच आहे, तृप्त न होणारे. त्याचे विवेकाने ताडन केले तरच ते ताब्यात राहील. अन्यथा, अहंकाराचा चारा त्याला पुष्ट करील. अहंकार दूर झाला की अंत:करण शुद्ध होते. शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात. विश्वाला प्रगतीच्या दिशेने नेतात....!!!
Sources : WhatsApp

गुरुवार, १९ मार्च, २०१५

निश्चयाने सारं काही बदलून जातं!

निश्चयाने सारं काही बदलून जातं!
माणसाच्या इच्छांना मर्यादा नसते, पण त्यापैकी कोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात याला मात्र निश्चितच मर्यादा असते. या मर्यादा येतात त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी आपण किती प्रयत्न करतो किंवा करीत नाही यामुळे. इच्छाकांक्षेपासून इच्छापूर्तीपर्यंतचा हा प्रवास तीन टप्प्यांचा असतो.
* पहिला टप्पा असतो एखाद्या गोष्टीची इच्छा धरणे.
*
दुसरा टप्पा असतो ती इच्छा घडून येण्यासाठी तसा निर्णय करणे आणि,
*
तिसरा टप्पा म्हणजे हा निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दृढनिश्चय करणे.
पहिला टप्पा पार करणे फार सोपे असते. ज्याला इच्छा नाहीत असा माणूस विरळाच. त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून निर्णय करणारेही अनेक लोक असतात, पण हा निर्णय खरा करण्यासाठी दृढ निश्चयाने झगडणारे मात्र कमी लोक असतात. आणि ज्या प्रमाणात निश्चयाचं बळ असतं त्याच प्रमाणात त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात.
निश्चय करणं म्हणजे स्वत:शी एक प्रतिज्ञा करणं. या प्रतिज्ञेमुळे तुमच्यावर ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी येऊन पडते. आणि जेव्हा जबाबदारी येते तेव्हा आपण थोडे गंभीर होऊन या सगळ्या प्रकाराकडे बघायला सुरुवात करतो. कारण आता इतर कोणी आपल्याला बोलो बोलो आपलं मन सतत आपल्याला बोलत असतं, टोचत असतं.
आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हात, पाय, डोके हलवणं भाग पाडतं. निश्चयाची गरजच मुळात का भासावी, असा एक प्रश्न इथे पडू शकतो. आपण जशी सामान्य, सहजपणे होणा-या गोष्टींची स्वप्नं बघत नाहीत, तसंच शक्य गोष्टींबाबतही आपण कधी निश्चय करत नाहीत. त्यामुळे या निश्चयांना आपोआपच एक गांभीर्य लाभत असतो, पण या निश्चयालाही थोड्या आधाराची, बळाची गरज असते. त्यासाठी काही उपाय असे.
* तुम्ही जो निश्चय कराल तो लिहून ठेवा.
*
तुमच्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगा.
*
दर दिवशी तुमच्या इच्छेसाठी तुम्ही काही तरी करा आणि त्याचा आढावा घ्या.
*
सुरुवातीलाच यश-अपयशाचा विचार करणं सोडून फक्त गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करा.
कोणत्याही लिखित गोष्टींमुळे एक पुरावा निर्माण होतो. हा पुरावा तुम्ही तुमचा वर्तमान आणि भविष्य चांगलं व्हावं यासाठी केलेला एक लिखित करारच असतो. जेव्हा तुम्ही त्याबाबत अनेकांना सांगता तेव्हा दरवेळी तुम्ही स्वत:लाही सांगत असता आणि त्याचवेळी ती माणसंही तुम्हाला वेळोवेळी त्याबाबत विचारून तुम्हाला त्याची आठवण करून देत असतात.
त्यामुळे तुम्हाला त्याचा विसर पडत नाही आणि तुम्ही त्यासाठी काही ना काही धडपड करू लागता. या गोष्टी कितीही लहान असोत त्या शेवटी तुमच्या इच्छापूर्तीची इमारत उभारण्यात विटांची भूमिका करतात. सुरुवातीलाच तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही याचा विचार करणं सोडून द्या आणि फक्त हाताशी असलेल्या लहान गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा.
तुमचा निश्चय अशा पद्धतीनं कायम राहील तेव्हाच तुमची इच्छापूर्ती होऊ शकेल.
शिवाजी महाराजांच्या बाबतीत संत रामदासांनी लिहून ठेवलंय,
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।
त्यातील तात्पर्य हेच आहे की ज्याच्या अंगी निश्चयाचे बळ असते तो स्वत:लाच नाही तर इतरांनाही त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आधार ठरू शकतो.
Sources : Unknown / कुठेतरी छानसे वाचलेले.


प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल ?

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: १९ मार्च :-
प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल ? निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणिमात्रांत असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट होत नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी, आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेमच जडते; विरूद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो, तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते. मग त्याच न्यायाने, त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का? 'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी म्हण आहे. त्याचा अर्थच असा की, स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे; आणि प्रेम जडण्याकरिता, सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरूवात आपल्या घरापासून करावी; घरातली माणसे, नंतर शेजारी, आणि त्यानंतर आजूबाजूला, आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी; म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे; आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये 'अमुक एक गोष्ट कराच' किंवा 'नकाच करू' असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते. प्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे; ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी, आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्‍न ठेवावा. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये.
                                                       

                                                                                                                                  

मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.


आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो.
मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो.
इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे.सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन म्हणजे पर्वतनिवासी.सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असा आहे.सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही.याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते.सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा सातवहनांची सत्ता असलेल्या राज्यांमधे हा सण साजरा केला जातो.गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही आवर्जुन ठेवायला हवी.