गुरुवार, १९ मार्च, २०१५

निश्चयाने सारं काही बदलून जातं!

निश्चयाने सारं काही बदलून जातं!
माणसाच्या इच्छांना मर्यादा नसते, पण त्यापैकी कोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात याला मात्र निश्चितच मर्यादा असते. या मर्यादा येतात त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी आपण किती प्रयत्न करतो किंवा करीत नाही यामुळे. इच्छाकांक्षेपासून इच्छापूर्तीपर्यंतचा हा प्रवास तीन टप्प्यांचा असतो.
* पहिला टप्पा असतो एखाद्या गोष्टीची इच्छा धरणे.
*
दुसरा टप्पा असतो ती इच्छा घडून येण्यासाठी तसा निर्णय करणे आणि,
*
तिसरा टप्पा म्हणजे हा निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दृढनिश्चय करणे.
पहिला टप्पा पार करणे फार सोपे असते. ज्याला इच्छा नाहीत असा माणूस विरळाच. त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून निर्णय करणारेही अनेक लोक असतात, पण हा निर्णय खरा करण्यासाठी दृढ निश्चयाने झगडणारे मात्र कमी लोक असतात. आणि ज्या प्रमाणात निश्चयाचं बळ असतं त्याच प्रमाणात त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात.
निश्चय करणं म्हणजे स्वत:शी एक प्रतिज्ञा करणं. या प्रतिज्ञेमुळे तुमच्यावर ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी येऊन पडते. आणि जेव्हा जबाबदारी येते तेव्हा आपण थोडे गंभीर होऊन या सगळ्या प्रकाराकडे बघायला सुरुवात करतो. कारण आता इतर कोणी आपल्याला बोलो बोलो आपलं मन सतत आपल्याला बोलत असतं, टोचत असतं.
आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हात, पाय, डोके हलवणं भाग पाडतं. निश्चयाची गरजच मुळात का भासावी, असा एक प्रश्न इथे पडू शकतो. आपण जशी सामान्य, सहजपणे होणा-या गोष्टींची स्वप्नं बघत नाहीत, तसंच शक्य गोष्टींबाबतही आपण कधी निश्चय करत नाहीत. त्यामुळे या निश्चयांना आपोआपच एक गांभीर्य लाभत असतो, पण या निश्चयालाही थोड्या आधाराची, बळाची गरज असते. त्यासाठी काही उपाय असे.
* तुम्ही जो निश्चय कराल तो लिहून ठेवा.
*
तुमच्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगा.
*
दर दिवशी तुमच्या इच्छेसाठी तुम्ही काही तरी करा आणि त्याचा आढावा घ्या.
*
सुरुवातीलाच यश-अपयशाचा विचार करणं सोडून फक्त गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करा.
कोणत्याही लिखित गोष्टींमुळे एक पुरावा निर्माण होतो. हा पुरावा तुम्ही तुमचा वर्तमान आणि भविष्य चांगलं व्हावं यासाठी केलेला एक लिखित करारच असतो. जेव्हा तुम्ही त्याबाबत अनेकांना सांगता तेव्हा दरवेळी तुम्ही स्वत:लाही सांगत असता आणि त्याचवेळी ती माणसंही तुम्हाला वेळोवेळी त्याबाबत विचारून तुम्हाला त्याची आठवण करून देत असतात.
त्यामुळे तुम्हाला त्याचा विसर पडत नाही आणि तुम्ही त्यासाठी काही ना काही धडपड करू लागता. या गोष्टी कितीही लहान असोत त्या शेवटी तुमच्या इच्छापूर्तीची इमारत उभारण्यात विटांची भूमिका करतात. सुरुवातीलाच तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही याचा विचार करणं सोडून द्या आणि फक्त हाताशी असलेल्या लहान गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा.
तुमचा निश्चय अशा पद्धतीनं कायम राहील तेव्हाच तुमची इच्छापूर्ती होऊ शकेल.
शिवाजी महाराजांच्या बाबतीत संत रामदासांनी लिहून ठेवलंय,
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।
त्यातील तात्पर्य हेच आहे की ज्याच्या अंगी निश्चयाचे बळ असते तो स्वत:लाच नाही तर इतरांनाही त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आधार ठरू शकतो.
Sources : Unknown / कुठेतरी छानसे वाचलेले.


प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल ?

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: १९ मार्च :-
प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल ? निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणिमात्रांत असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट होत नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी, आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेमच जडते; विरूद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो, तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते. मग त्याच न्यायाने, त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का? 'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी म्हण आहे. त्याचा अर्थच असा की, स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे; आणि प्रेम जडण्याकरिता, सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरूवात आपल्या घरापासून करावी; घरातली माणसे, नंतर शेजारी, आणि त्यानंतर आजूबाजूला, आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी; म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे; आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये 'अमुक एक गोष्ट कराच' किंवा 'नकाच करू' असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते. प्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे; ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी, आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्‍न ठेवावा. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये.
                                                       

                                                                                                                                  

मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.


आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो.
मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो.
इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे.सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन म्हणजे पर्वतनिवासी.सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असा आहे.सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही.याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते.सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा सातवहनांची सत्ता असलेल्या राज्यांमधे हा सण साजरा केला जातो.गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही आवर्जुन ठेवायला हवी.

रविवार, १५ मार्च, २०१५

तप म्हणजे काय ?

तप म्हणजे काय ?तर आपले शारीरिक ,मानसिक अथवा
बुद्धीचे बल वाढवण्यासाठी शरीरास झिजवणे .म्हणजे नको
असलेली शक्ती कमी करून हवी असलेली वाढवणे
.भगवंताच्या जवळ नेणारी शक्ती वाढवणे .
तप हे शारीरिक मानसिक अथवा वाचिक अशा तीन प्रकारचे
आहे ,तसेच प्राण्यांच्या स्वाभाविक गुणांप्रमाणे तपही
सात्विक ,राजस अथवा तामस गुणांनी युक्त आहे .वाचिक
तप म्हणजे काय हे सांगताना भगवंत म्हणतात ,
जे दुसऱ्याला दुख्ख न देणारे ,सत्य ,प्रिय पण हितकर बोलणे
व स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाचिक अथवा
वाण्ग्मयीन तप असे म्हणतात .ज्याप्रमाणे परीस हा
स्पर्शाने लोखंडाचे सोने करतो ,त्याप्रमाणे श्रोत्यांना सुख
होईल असा चांगुलपणा ज्या बोलण्यात असतो ,अथवा
ज्याप्रमाणे पाणी मुख्य झाडाला जाताना
पाटाच्या काठावरचे गवतही सहज जगते ,त्याप्रमाणे
ज्याच्या बोलण्याने सर्वांचेच हित होते ,
जसे अमृत जीवाला अमर करते ,पाप व ताप नाहीसे करते व
पिणाराला गोडीही देते ,त्याप्रमाणे आपल्या बोलण्याने
अज्ञान नाहीसे होते ,आत्मस्वरूप प्राप्त होते व कितीही
ऐकले तरी या बोलण्याचा वीट येत नाही .
रुग्वेदादी तिन्ही वेद या तापसाच्या वाचारूपी मंदिरात स्थापन
केले जातात व मुखाने वेद अथवा भगवंताचे नाम याचे अखंड
पठण चाललेले असते .हे सर्व वाचिक तप समजावे .
हेच तप जर फळाची आशा न धरता ,पूर्ण सत्व्शुध्ढीने युक्त
अशा मनुष्यांनी आस्तिक बुद्धीने आचरले तर त्याला
सात्विक तप म्हणतात .
वाचिक तप हे पावक म्हणजे दुसर्याला पवित्र करील असे
असते ,स्वतः झिजत दुसर्याची वाढ करणे ,आपल्या
बोलण्याने दुसर्याची बुद्धी तेजस्वी ,क्रियाशील ,शुध्द
वर्तनाची व्हावी हि वाचिक तपाची भूमिका .
गीतेतील तात्विक भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवताना
श्रीज्ञानेश्वर आपल्या दृष्टांताने ,अलंकार ,उपमा यांच्या
वापराने या विचाराचे अनुभवाच्या अंगाने दर्शन घडवतात
,अनुभवाच्या भाषेतून आपल्याला परमेश्वराच्या जवळ
जाण्याचा अनुभव देतात .व्यवहार ,नीतिशास्त्र ,धर्म दर्शन
या सर्व गोष्टीना ते अनुभवाच्या भाषेने समूर्त करतात .
आपल्या श्रोतृ वृंदाला बरोबर घेऊन ज्ञानेश्वरीची वाटचाल
करताना श्री ज्ञानेश्वरांनी सर्वाना जो अमृतानुभव दिला
त्यामुळे या त्यांच्या तपास वाचिक तप म्हणणे सर्वार्थाने
योग्य आहे .