रविवार, १५ मार्च, २०१५

तप म्हणजे काय ?

तप म्हणजे काय ?तर आपले शारीरिक ,मानसिक अथवा
बुद्धीचे बल वाढवण्यासाठी शरीरास झिजवणे .म्हणजे नको
असलेली शक्ती कमी करून हवी असलेली वाढवणे
.भगवंताच्या जवळ नेणारी शक्ती वाढवणे .
तप हे शारीरिक मानसिक अथवा वाचिक अशा तीन प्रकारचे
आहे ,तसेच प्राण्यांच्या स्वाभाविक गुणांप्रमाणे तपही
सात्विक ,राजस अथवा तामस गुणांनी युक्त आहे .वाचिक
तप म्हणजे काय हे सांगताना भगवंत म्हणतात ,
जे दुसऱ्याला दुख्ख न देणारे ,सत्य ,प्रिय पण हितकर बोलणे
व स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाचिक अथवा
वाण्ग्मयीन तप असे म्हणतात .ज्याप्रमाणे परीस हा
स्पर्शाने लोखंडाचे सोने करतो ,त्याप्रमाणे श्रोत्यांना सुख
होईल असा चांगुलपणा ज्या बोलण्यात असतो ,अथवा
ज्याप्रमाणे पाणी मुख्य झाडाला जाताना
पाटाच्या काठावरचे गवतही सहज जगते ,त्याप्रमाणे
ज्याच्या बोलण्याने सर्वांचेच हित होते ,
जसे अमृत जीवाला अमर करते ,पाप व ताप नाहीसे करते व
पिणाराला गोडीही देते ,त्याप्रमाणे आपल्या बोलण्याने
अज्ञान नाहीसे होते ,आत्मस्वरूप प्राप्त होते व कितीही
ऐकले तरी या बोलण्याचा वीट येत नाही .
रुग्वेदादी तिन्ही वेद या तापसाच्या वाचारूपी मंदिरात स्थापन
केले जातात व मुखाने वेद अथवा भगवंताचे नाम याचे अखंड
पठण चाललेले असते .हे सर्व वाचिक तप समजावे .
हेच तप जर फळाची आशा न धरता ,पूर्ण सत्व्शुध्ढीने युक्त
अशा मनुष्यांनी आस्तिक बुद्धीने आचरले तर त्याला
सात्विक तप म्हणतात .
वाचिक तप हे पावक म्हणजे दुसर्याला पवित्र करील असे
असते ,स्वतः झिजत दुसर्याची वाढ करणे ,आपल्या
बोलण्याने दुसर्याची बुद्धी तेजस्वी ,क्रियाशील ,शुध्द
वर्तनाची व्हावी हि वाचिक तपाची भूमिका .
गीतेतील तात्विक भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवताना
श्रीज्ञानेश्वर आपल्या दृष्टांताने ,अलंकार ,उपमा यांच्या
वापराने या विचाराचे अनुभवाच्या अंगाने दर्शन घडवतात
,अनुभवाच्या भाषेतून आपल्याला परमेश्वराच्या जवळ
जाण्याचा अनुभव देतात .व्यवहार ,नीतिशास्त्र ,धर्म दर्शन
या सर्व गोष्टीना ते अनुभवाच्या भाषेने समूर्त करतात .
आपल्या श्रोतृ वृंदाला बरोबर घेऊन ज्ञानेश्वरीची वाटचाल
करताना श्री ज्ञानेश्वरांनी सर्वाना जो अमृतानुभव दिला
त्यामुळे या त्यांच्या तपास वाचिक तप म्हणणे सर्वार्थाने
योग्य आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा