
मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो.
इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे.सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन म्हणजे पर्वतनिवासी.सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असा आहे.सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही.याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते.सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा सातवहनांची सत्ता असलेल्या राज्यांमधे हा सण साजरा केला जातो.गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही आवर्जुन ठेवायला हवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा