आपल्याला
सर्वसामान्यपणे अस आढळून येत की अचानक संकट ओढवलं किंवा संकट ओढवणार आहे
अशी भिती भेडसावत राहीली की काय करावं ते सुचत नाही.कशातच मन लागत नाही.
डोक्यात एकसारखे संकटाचेच विचार.चिंतेच्या ओशट पाकाने मन अगदी चिकट होवून जात, तरी पाक होईपर्यंत काळजी करत रहाणं आपण सोडत नाही.
संकटाची तीव्रता ही आपलं किती आणि कोणत नुकसान होणार यावर अवलंबून असते. आपापल्या वृत्तीनुसार आपण त्या त्या नुकसानाला महत्त्व देतो.
या नको त्या चिंता वहाण्यात एक नुकसान मात्र कायमचच होत रहात ते म्हणजे "
आत्म्याचं उन्नयन, प्रगती " पण ते देहबुद्धीच्या हिशोबीच नसत, त्यामुळे
त्याची कधी दखलच घेतली जात नाही.
जीवनातल्या इतर ज्या समस्या आहेत की ज्यामुळे आपण त्रस्त होवून जातो , त्यांनी मनस्वास्थ्य बिघडविण्याचं खरोखर कारण नाही.
समस्या कोणतीही असो, प्रत्येकीवर एक समान उपाय आहे तो म्हणजे . ....
सध्या ताबडतोब ती समस्या जशी आहे तशी स्वीकारणं .
घरातील कर्त्या व्यक्तीचा, जिवलगांचा मृत्यु, जन्मत: शारीरिक वैगुण्य
घेवून जन्मलेलं मूल , आजार अपघातामुळे येवू घातलेलं कायमस्वरुपी अपंगत्व
असे कितीतरी प्रसंग ते आपल्याशी अखेरपर्यंत जोडलेलेच रहाणार आहेत.ते
प्रारब्ध म्हणून स्वीकारणं हेच श्रेयस्कर असत.
काही समस्या अशा
आहेत की प्रयत्नांनी, युक्तीने त्या निघून जावू शकतात.आपसातल्या कुरबुरी,
भांडण तंटे, आजार, नोकरीच्या ठिकाणी त्रास, धंद्यात अडचणी , आर्थिक बाबी,
अशा ज्या गोष्टींची समस्या होते , त्यापाठची कारण शांतपणे पहाता येतात ,
त्यावर मार्ग काढता येतो.
परंतु ह्याप्रकारच्या समस्या आल्या की कोलमडून जाण्याच्या काही कारणात मुख्यत्वेकरुन पुढील कारण असतात.
मी हे कसं पेलणार , ह्या आत्मविश्वासाची कमी.पण लक्षात घेतल पाहिजे की
स्वत:वर विश्वास असेल तरच नशीब साथ देत.
दुसरं कारण म्हणजे आतापर्यंत लोकांपुढे सर्व छान दिसत होत , आता लोक काय म्हणतील ही अकारण वाजवीपेक्षा पोसलेली भेकड वृत्ती
आणखी कारण म्हणजे माझं सर्व नेहमी सुरळीतच चालावं अस एकसंधी आयुष्य हवं असण्याची दृढ मागणी .
अशा कारणांना धक्का लागला की आपण स्वत:ला सावरु शकत नाही.संकट आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं भासत.
बौद्धिक चाचणी परिक्षेत एक प्रश्न देतात , तो असा की कागदावर एक रेषाखंड
काढला जातो.जराही खाडाखोड न करता त्याची लांबी कमी करुन दाखवायची.
ह्याचं उत्तर म्हणजे त्याच्या बाजूला जास्त लांबीचा दुसरा रेषाखंड काढायचा.
आयुष्यात भेडसावणार्या समस्यांच्या बाबतीत असच करायचं.
समस्येपेक्षा मोठ्या दृष्टीकोनातून तिच्याकडे पहावं. काही न काहीतरी उत्तर सापडतच.
समजा आर्थिक समस्या आ वासून उभी आहे तर मग योग्य प्रकारे आवक होईल असे इतर पर्याय नक्कीच आहेत, ते निवडता येतात.
असे बदल करताना ते स्वीकारण्याची मनाची तयारी नसते, हा खरा प्रॉब्लेम असतो.
मुख्य समस्येतून बाहेर पडायचय तर सर्व आहे तस रहाव, ही चूकीची अपेक्षा आहे.
इतर गोष्टींशी तडजोड ही ओघानं येणारच.
मनाकडे प्रचंड उमेद आहे, उर्जा आहे.मनाने एकदा मनावर घेतलं तर अशक्य अस काहीच नाही.
मात्र मनाला ताळ्यावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच.
" नामस्मरण " हा यासाठी हमखास उपाय आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर विचार न करत बसता " नाम " घ्यावं.
नामाकडे अचाट सामर्थ्य आहे.ते आपला प्रभाव दाखवणारच.
बुद्धीवर नामाचा प्रभाव होतो तेव्हा अशा विपरीत परिस्थितीत बुद्धी स्थिर ठेवण्याची , योग्य अयोग्याची निवड करण्याची क्षमता येते.
परिस्थितीवर मात करायची म्हणजे तत्व, मूल्य ह्यांच्याशी तडजोड करावी अस नाही.
हे धैर्य , सामोरं जायची निर्भयता " नामा " कडे आहे..
हे सुद्धा लक्षात घेवून स्वत:ला भाग्यवान समजावं की जेव्हा संकट येत
तेव्हा माझ्या आराध्यावर माझी दृढ निष्ठा आहे की नाही हे सिद्ध होत.जेव्हा
ते होकारार्थी येत तेव्हा अत्यानंदाने मन फुलून येत.
मग कोणती समस्या न कसलं काय !! अनुभवता येत ते फक्त सुख आणि सुखच !!! परमानंद !!