सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

एकादशी

 एकादशी :



प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे.
या संबंधीचे सूक्ष्म विवेचन निर्णयसिंधु त केलेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादश्या येतात. शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी.कृष्ण पक्षातील : वरूथिनी, अपरा,योगिनी,
कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला असे नाव आहे.
रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. या दिवशी उपवास केला असता सर्व कामना परिपूर्ण होतात व वैष्णवपदही प्राप्त होते. आषाढ शु. एकादशीस
महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले. कार्तिक शु. एकादशीस विष्णू जागे होतात म्हणून प्रबोधिनी असे नाव पडले. आषाढी व कार्तिकी ह्या एकादश्यांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष शु. एकादशी हा दिवस ‘गीताजंयती’ म्हणून प्रसिध्द आहे. प्रदेशपरत्वे एकादशीव्रत आचरण्याचे प्रकार भिन्न भिन्न आढळतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा